नाशिक: दीड वर्षाच्या मुलीवर घरीच उपचार करणं तिच्या जीवावर बेतलं: पित्याला अटक
नाशिक (प्रतिनिधी): कुठलंही वैद्यकीय ज्ञान नसतांना आपल्या १४ महिन्याच्या मुलीवर घरीच उपचार करणं तिच्या जीवावर बेतलं आहे. ही घटना नाशिक शहरातील आहे.
कोणतेही वैद्यकीय ज्ञान आणि अनुभव नसताना आजारी मुलीवर घरीच उपचार केल्याने पोटच्या दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी पित्यास अटक केली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेमंत भारत शेटे (रा. ३५, रा.शिवगणेश अपार्टमेंट, मखमलाबाद रोड, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रिया हेमंत शेटे (वय १४ महिने) असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया हेमंत शेटे ही आजारी असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, ती पूर्ण बरी होण्याआधीच व डिस्चार्ज होण्यापूर्वीच तिला घरी आणून हेमंत शेटे यांनी तिच्यावर सलाईन व इतर उपचार केले. निष्काळजीपणाने घरीच उपचार केल्यामुळे शनिवारी (दि. २३) सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी रियाचा पचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी त्याच्याविरोधात मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.