नाशिक: हेल्मेट नसल्यास आजपासून (दि. १८ जानेवारी २०२२) चालकांवर होणार ही कारवाई
नाशिक (प्रतिनिधी): वाढते अपघात लक्षात घेता पोलिस आयुक्तांनी दुचाकीधारकांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले आहे.
विविध मोहिमेद्वारे वाहनधारकांमध्ये जनजागृती देखील करण्यात आली.
मात्र यापुढे हेल्मेट नसल्यास वाहनधारकांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात मंगळवार दि. १८ पासून ही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच विनाहेल्मेट दुसऱ्यांदा आढळल्यास तर त्या वाहनधारकांचा थेट परवाना रद्द करण्यात येणार आहे.
नाशिक शहरात अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र दुचाकीधारकांकडून हेल्मेट वापरण्याचे टाळले जात असल्याने बळी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. याच पार्श्वभूमीवर दुचाकीधारकांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांनी नियमित हेल्मेट परिधान करावे यासाठी पोलिसांच्या वतीने ‘ नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम राबविण्यात आली होती.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9745,9747,9743″]
त्यानंतर विनाहेल्मेट वाहनधारकांवर कारवाई करत ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क येथे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. ‘हेल्मेट नाही तर सहकार्य नाही’ याद्वारे विनाहेल्मेट वाहनधारकांना शासकीय कार्यालय, तसेच खासगी कार्यालयात देखील प्रवेश नाकारण्यात आला. हेल्मेट वाहनधारकांचा टक्का वाढविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली आहे. हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांविरोधात मंगळवारपासून थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट नसल्यास वाहनधारकास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढल्यास १००० रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी त्या वाहनधारकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित केला जाणार आहे. अचानकपणे वाहनधारकांची तपासणी करण्यात येणार आहे.