नाशिक: वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावत लुटले दागिने आणि तीन कोरे धनादेश
नाशिक (प्रतिनिधी): कुरिअर आल्याचे सांगत बळजबरीने घरात घुसून वृद्धेच्या गळ्याचा चाकू लावत हातातील तीन हिरेजडित सोन्याच्या अंगठ्या आणि तीन कोरे चेक लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार (दि. १४) संचेती पार्क अॅव्हेन्यू (होलाराम कॉलनी) येथे उघडकीस आला.
संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
काम करणाऱ्या महिलेने घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद केल्याने हा पूर्वनियोजित प्लॅन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भरदिवसा घडलेल्या प्रकाराने पोलिस यंत्रणेचा वचक राहिला नसल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पद्मा केला यांच्या फिर्यादीनुसार दुपारी ३ वाजता घरात असताना कामवाल्या बाईला साफसफाई करण्यास सांगितले. काही वेळात फ्लॅटची बेल वाजली. जॅकेट घातलेला तरुण कुरिअर असल्याचे सांगत बळजबरीने घरात घुसला. फोनवर ओटीपी आला असेल, असे म्हणत बळजबरीने फोन घेतला. केला यांनी कामवाल्या बाईला ओरडण्याचा इशारा केला मात्र ती गप्प राहिली. संशयिताने केला यांच्या गळ्याला चाकू लावत हातातील अंगठ्या काढून घेतल्या. एक अंगठी निघत नसल्याने संशयिताने बळजबरी करून अंगठी काढून घेतली. पैसे कुठे आहे, असे विचारले असता त्यांनी घरात पैसे नाही असे सांगितल्यानंतर संशयिताने चेक बुकची विचारणा केली.
चेकवर बळजबरीने सह्या करण्यास सांगितले. केला यांनी नकार दिला तर तुझ्या जावयाला ठार मारेन, अशी धमकी दिल्याने केला यांनी तीन कोऱ्या चेकवर सह्या करून दिल्या. संशयित अंगठ्या आणि चेक घेऊन लिफ्टने फरार झाला. घडलेला प्रकार सरकारवाडा पोलिसांना कळताच वरिष्ठ निरीक्षण साजन सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत तपासाच्या सूचना दिल्या.
घटनेची माहिती मिळताच श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयिताने नियोजनबद्ध लूट केल्याने ठसे मिळून आले नाही. तसेच लूट करून संशयित लिफ्टने फरार झाल्याने श्वानाने लिफ्टपर्यंतच माग काढला.