नाशिक: या महिलेला १० रुपयांचं कुरकुरेचं पाकीट पडलं ६३ हजार रुपयांना…
नाशिक (प्रतिनिधी): येथील एका महिलेला १० रुपयांचं कुरकुरेचं पाकीट ६३ हजार रुपयांना पडलं आहे..
भावासोबत देवदर्शनासाठी जाणारी महिला मुलीसाठी कुरकुरे घेण्याकरिता थांबली होती.
त्याचवेळी अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने खेचून नेल्याची घटना माडसांगवी येथे घडली.
फिर्यादी काजोल तुषार घुमरे (रा. मु. पो. नैताळे, ता. निफाड, जि. नाशिक) ही महिला काल दुपारी भावासोबत देवदर्शनासाठी गाडीने जात होती. त्यावेळी त्यांची मुलगी ओवी रडू लागल्याने माडसांगवी माळ येथील एका किराणा दुकानासमोर त्यांनी गाडी थांबविली व मुलीला कुरकुरे विकत घेण्यासाठी गेली.
कुरकुरे घेऊन गाडीकडे परत येत असताना त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने बळजबरीने त्यांच्या गळ्यातील ६३ हजार रुपये किमतीची 21 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत खेचून पोबारा केला. दरम्यान यानंतर भांबावलेल्या महिलेने आडगाव पोलीस ठाण्यात मंगळसूत्र चोरीची फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.