नाशिक: डॉ. सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा
नाशिक (प्रतिनिधी): २६ जानेवारी रोजी नाशिक शहरानजीक वाडीवऱ्हे येथील रायगडनगर मध्ये संपूर्ण जळून खाक झालेल्या कारमध्ये मानवी सांगाडा मिळून आला होता.
हा सांगाडा बेपत्ता डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याची चर्चा सर्वत सुरू होती.
आता डीएनए चाचणी अहवालातून हा सांगाडा डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांच्या माहेरच्या नातेवाईकांकडून काही गंभीर माहिती पोलिसांना मिळाली असल्याचं समजतंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जानेवारी रोजी पती संदीप वाजे यांनी अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नी डॉ. सुवर्णा वाजे बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. डॉ. सुवर्णा संदीप वाजे ह्या नाशिक महानगर पालिकेच्या मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
महत्वाचे: Breaking: डॉ. सुवर्णा वाजे मृत्युप्रकरण; पती संदीप वाजेला ग्रामीण पोलिसांकडून अटक !
मात्र त्याच दिवशी वाडीवाऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायगडनगर जवळ रस्त्याच्या कडेला एक जळालेल्या अवस्थेत चारचाकी वाहन तसेच गाडीत एक सांगाडा पोलिसांना मिळून आला होता. सदर घटनेची वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला या तपासात गाडीच्या चेसेस नंबर वरून जळालेली कार डॉ. वाजे यांचीच असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र सांगाडा कोणाचा आहे हे शोधण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. यात डॉ. सुवर्णा यांच्या कुटुंबियांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. यानंतर आलेल्या अहवालात सदर सांगाडा डॉ. सुवर्णा यांचाच असल्याचं निष्पन्न झालं.
सापळा डॉ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याच असल्याचा अहवाल बुधवारी पोलिसांना प्राप्त झाला. यानंतर नातेवाईकांनी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून झाल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांनी आता आरोपीला पकडण्यासाठी कंबर कसली असून प्रत्येकाचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे.