नाशिक: कंपनीच्या छतावरून पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): कंपनीच्या तब्बल ७० फुट उंचीच्या छतावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील जेबीएम इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यातील छताच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
आज (दि. २५ फेब्रुवारी) सकाळी साडे अकराच्या सुमारास दुरुस्तीचे काम करतांना एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिक: बिल न भरल्यास वीजपुरवठा होणार खंडित; वीज बिल भरणा केंद्रे या दिवशीसुद्धा सुरु राहणार
याबाबत अधिक माहिती अशी की संजीव कुमार यादव (वय 31) असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेश अलिगड जिल्ह्यातील अरोहत्ती सध्या राहणार- सोमेश्वर कॉलनी सातपूर येथील रहिवासी होता. तसेच मिळालेल्या माहितीनुसार मयत युवक या कारखान्यातील सोलर सिस्टमच्या दुरुस्तीचे काम करत असताना तब्बल 70 फुट उंचीच्या छतावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यास तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी संजीव कुमार यादव यास तपासून मयत घोषित केले.
दरम्यान या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे करीत आहे.