नाशिक (प्रतिनिधी): अत्याधुनिक पद्धतीने होणाऱ्या शस्त्रक्रिया, विकसित तंत्रज्ञान आणि अनुभवी व प्रशिक्षित डॉक्टर्स यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता सहज आणि सोप्या होण्यास मदत होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी अपोलो हॉस्पिटल समूह नेहमीच अग्रेसर असतो. याच पार्श्वभूमीवर अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये फक्त दोन महिन्यांत ५० सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.
अस्थिरोग आणि सांधेरोपणतज्ज्ञ डॉ. जयेश सोनजे म्हणाले की, सांधेरोपणाची गरज असलेल्या रुग्णांवर “नोव्हो टेक्निक” पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येते. यामध्ये फक्त १५ सेमी. काप देऊन अवघ्या 25 ते 30 मिनिटात गुडघे किंवा खुब्याचे सांधेरोपण करता येते. याचे अनेक फायदे आहेत. लहान स्नायू कापावा लागत नाही, वेदना खूप कमी होतात. शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ कमी लागतो, रक्तस्त्राव कमी होतो. रुग्णाला ३ ते ४ दिवसात घरी जात येते. औषधे कमी लागतात, फिजिओथेरपी कमी लागते आणि यामुळे खर्च कमी होतो. नोव्हो तंत्रज्ञान पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण लवकर बरा होतो. गुडघे किंवा खुब्याच्या असह्य दुखण्यावर जेव्हा सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्याने ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम करणे, चालणे इत्यादी दैनंदिन कामे करणे सोपे होते. त्यांना इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही.
गुडघे दुखी आणि सांधे प्रत्यारोपणाबद्दल माहिती देताना अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अनिल जाधव म्हणाले की आपल्या सांध्यांची वयानुरूप झीज होत असते. हा आजार नसून, वयानुरूप शरीरात झालेले नैसर्गिक बदल होय. याचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा, वाढते वय आणि हाडांची ठिसूळता. आपल्या गुडघ्यावर दीड सेंटीमीटरची गादी असते आणि त्या गादीची झीज होत असते. जेव्हा झीज जास्त होते, तेव्हा गुडघेदुखीचा त्रास असह्य होतो. गुडघ्याची गादी पूर्णतः खराब झाल्यावर सांधेरोपणाची गरज पडते. यामध्ये खराब झालेल्या गादीवर कृत्रिम सांध्याचे आवरण बसवून गुडघ्याची हालचाल पूर्ववत केली जाते. याला आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणतो.
अपोलो हॉस्पिटल नाशिकचे युनिट हेड अजित झा म्हणाले की, डॉ. जयेश सोनजे यांच्या “नोव्हो टेक्निक” या सांधेरोपण करण्याच्या पद्धतीचा निकाल खूपच चांगला आहे. उत्तर महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधून देखील रुग्ण आता नाशिकमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी येत आहेत. तसेच अपोलोमध्ये असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी निष्णात डॉक्टरांच्या टीम वर्कमुळे रुग्णांना त्याचा फायदा होतो, रुग्णांची गैरसोय होत नाही. सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या प्रतिक्रिया अतिशय चांगल्या असून आणि त्यांचे समाधान झाले आहे याचा अभिमान वाटतो.
या वेळी सांधेरपोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले अनुभव कथन केले. जिजाबाई गवळी (वय ६७) यांचे पुत्र ईश्वर गवळी म्हणाले की, आईच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करायची होती. मनात भीती होती. सर्व ठिकाणी चौकशी केल्यानंतर डॉ. सोनजे यांच्याकडून या शस्त्रक्रियेबद्दल माहिती घेतली. त्यांनी योग्य मार्गदर्शन करून आमच्या मनात विश्वास निर्माण केला. आमची भीती दूर केली. शस्त्रक्रिया, औषोधोपचार आणि आवश्यक काळजी घेतल्यानंतर आई व्यवस्थित चालू शकत आहे. नारायण जाधव यांनीही आपल्या बहिणीवर केलेल्या शस्त्रक्रियेविषयी अनुभव कथन केले.