दुर्दैवी घटना: गेला होता दोघांचे भांडण सोडवायला, अन् स्वत:चाच जीव गमावून बसला
नाशिक (प्रतिनिधी): भांडण सोडविण्याच्या नादात इतरांना समजवून सांगण्याचा मोठेपणा कधी कधी अंगाशी येतो.
असाच प्रकार उघडकीस नाशिक जिल्ह्यात घडला आहे.
उत्तर प्रदेशातील येथे स्थायिक असलेल्या दोन अननस विक्रेत्यांच्या वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या रस विक्रेत्याचा रागाच्या भरात एकाने चाकूने वार करून खून केला.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे हा प्रकार घडला आहे. खून झालेल्या व्यक्तीचा शालक मनोजकुमार राजकुमार कुशवाह यांच्या फिर्यादीवरून अननस विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील मृत व संशयित आरोपी परप्रांतीय आहेत.
फिर्यादी मनोज राजकुमार कुशवाह (वय ३०, धंदा- पोगें विक्री, रा. बिरमपूर, ता. तिरवा, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश, ह. मु. बुंदेलपुरा, येवला) याने फिर्यादीत म्हटले आहे, की शहरात दहा वर्षांपासून बहीण सीमा व तिचे पती मनोजकुमार प्रभुदयाल कुशवाह यांच्या सोबत राहत आहे. तसेच गावाकडीलही इतर मुलेही शहर परिसरात अननस विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी (ता. ३०) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
मनोजकुमार प्रभुदयाल कुशवाह (रा. मल्लपूर्वा, ता. गलालाबाद, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव असून, ते उसाचा रस विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांच्या ओळखीने गावाकडीलही इतर काही मुले येवल्यात आली असून, ते अननस विक्री करतात. त्यापैकी एक ब्रिजेशकुमार रामशंकर कुशवाह, (रा. भवानीपूर, ता. तिरवा, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश) याने त्याचा साथीदार गुलाबसिंग याचे अननस खाल्याने दोघांचा वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी मनोजकुमारने दोघांची समजूत काढली. परंतु ब्रिजेशकुमार ऐकत नसल्याने मनोजकुमारने त्यास चापटी मारून तेथून हाकलले.