घरात कुणी नसल्याची संधी साधत सास-याने केला सूनेचा विनयभंग, गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): घरात कुणी नसल्याची संधी साधत ५४ वर्षीय सास-याने आपल्या सूनेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पीडितेने पतीसह सासूकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीतील राहूलनगर भागात राहणा-या पीडित विवाहीतेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
संशयितास दारूचे व्यसन असल्याने तो खडकाळी भागात पत्नीसह मुलांपासून विभक्त राहतो. अनेक उपाययोजना करूनही संशयित ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर कुटुंबियांनीच त्याची विभक्त राहण्याची व्यवस्था करून दिली आहे.
उतारवयात खाण्यापिण्याचे हाल होवू नये म्हणून मुलाने त्यास आपल्या घरी येण्या जाण्याची मुभा दिली होती. पीडित सून खाण्यापिण्यास देत असतांना संशयिताने हे कृत्य केले. बुधवारी (दि.३१) रात्री पीडिता आपल्या लहान मुलांसह घरात एकटी असतांना संशयिताने तिच्याशी अंगलट करीत विनयभंग केला. पत्नी आणि मुलगा घरात नसल्याची संधी साधत सास-याने आपल्या सूनेवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सासू आणि पती घरी परतल्यानंतर पीडितेने आपबिती कथन केल्याने सासूने आपल्या नव-या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सूनेसह पोलिस स्थानकात गेली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.