केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन…

नाशिक (प्रतिनिधी) : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण झाले. असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शनिवारी (दि.३०) रात्री १० वाजेच्या सुमारास छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ताडमेटला परिसरातल्या बुरकाल येथून ६ किलोमीटर अंतरावर स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०६ कोब्रा बटालियनचे सहायक कमांडन्ट नितीन भालेराव यांना वीरमरण आले होते.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवपूर या गावचे मुळ असलेले शहीद नितीन भालेराव हे नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्याला होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन येथे पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून केंद्रीय राखीव दलात दाखल झाले होते. २०१० साली केंद्रिय राखीव पोलीस दलात भरती झालेले जवान नितीन भालेराव यांनी सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे सेवा बजावली होती त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या विशेष संरक्षण टीम मध्ये त्यांनी सेवा दिली होती. त्यानंतर राजस्थान मधील माउंटअबू स्थित ‘अंतर्गत सुरक्षा अकादमी’ येथे त्यांनी काम केले होते. जून महिन्यापासून ते २०६ कोब्रा बटालियन मध्ये सहाय्यक कमांडन्ट म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, नक्षलवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होतं. देशांतर्गत झालेल्या विविध लढाऊ स्पर्धेत शहीद नितीन भालेराव यांनी उत्तम कामगिरी केली होती. शहीद नितीन भालेराव यांच्या पश्चात आई भारती, पत्नी रश्मी, मुलगी अन्वी, तर दोन भाऊ अमोल व सुयोग असा परिवार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group