नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयाचे खासगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून मागणी करण्यात आली होती. मात्र हे रुग्णालय गोरगरिबांसाठी महत्वाचे आहे. तसेच शासकीय रुग्णालय खासगी संस्थेत विलीन केले तर संबंधित कराराबाबत नंतर संस्थांना विसर पडतो. गरिबांना मोफत किंवा अल्प दरात उपचार मिळत नाही. बिटको रुग्णालय महापालिकेकडे असले तर गरिबांना त्याचा लाभ उठवता येईल म्हणून त्याचे खासगीकरण केले जाणार नाही असे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले.
मागे स्थायी समितीच्या बैठकीत सभापती गणेश गीते यांनी आलेल्या तक्रारींवरून रुग्णालय व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्यात येईल. खासगीकरणानंतर ही गोरगरिबांसाठी खाटा आरक्षित ठेवण्यात येईल असे ते म्हणाले होते. मात्र महासभेत भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी हा मुद्दा मांडल्यावर नाशिकरोडच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यास विरोध दर्शवला होता. तरी आयुक्त कैलास जाधव यांनी घेतलेल्या स्पष्ट भूमिकेतून बिटको रुग्णालयाचे खाजगीकरण कुठल्याही परिस्थितीत केले जाणार नाही असे दिसून येते.