नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महापालिकेची सहाही विभागांत सुमारे ११० कोटींची पाणीपट्टी थकली असून, बिले भरण्याकडे नागरिकांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नववर्षात कर संकलन विभागाच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन राबविण्याची तयारी करण्यात येत आहे.
करसंकलन विभागाने घरपट्टी वसुलीचा धडाका लावला असला तरी पाणीपट्टी थकबाकीचा आकडा तब्बल ११० कोटींवर पोहोचल्याने डोकेदुखी वाढली आहे. मागील नऊ महिन्यांत ३५ कोटींची वसुली झाली आहे.
त्यामुळे आता करसंकलन विभाग आक्रमक पवित्रा घेणार असून, नवीन वर्षात मोठ्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करणार असून, विभागाकडून बड्या थकबाकीदारांच्या याद्या मागविल्या आहेत.
मनपा आयुक्तांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या सूचनेनुसार चालू आर्थिक वर्षात करसंकलन विभागाला मालमत्ता उद्दिष्ट २१० कोटींवरून २५० कोटी केले आहे, तर पाणीपट्टी वसुलीचे ७५ कोटींचे उद्दिष्ट दिले आहेत, एप्रिल ते जून या कालावधीत सवलत योजना राबविल्यामुळे मालमत्ता कराची बंपर वसुली झाली. पाणीपट्टीची बिले वाटप आता अंतिम टप्यात असून, त्यानंतर करसंकलन विभाग थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई करणार आहे.
करसंकलन उपायुक्तांनी विभागनिहाय बड्या पाणीपट्टी नागरिक, व्यावसायिक आणि आस्थापना यांची यादी मागविली आहे.
सहाही विभागात सूचना:
महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने सिडको, सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि पंचवटी प्रभागांमध्ये कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देत तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
करसंकलनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. लवकरात लवकर थकबाकी न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.