नाशिक (प्रतिनिधी): अवैध सावकारी चालवत कर्जदारांचा आर्थिक-मानसिक व शारीरिक छळ करणारा संशयित आरोपी वैभव देवरे याच्यासह त्याच्या टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत (मोक्का) विविध वाढीव कलमांन्वये कारवाई करत दणका दिला आहे.
पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेले इंदिरानगर, अंबड, गंगापूर, मुंबईनाका या चार पोलिस ठाण्यांमध्ये वैभव देवरे, त्याची पत्नी सोनल देवरे या दाम्पत्यासह टोळवर एकूण १५ गुन्हे दाखल आहे. ही टोळी नियोजनबद्ध पूर्व कट रचून गरजू लोकांना जाळ्यात घेत कर्जाचे आमिष दाखवत अर्थसाहाय्याचा बनाव करून छळ करत लाखो रुपयांची फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टोळीप्रमुख वैभव यादवराव देवरे, गोविंद पांडुरंग ससाणे, सोनल वैभव देवरे, निखिल नामदेवर पवार यांच्याविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. देवरे याने यांच्यासोबत मिळून टोळी निर्माण करून एकट्याने किंवा संघटितरीत्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इंदिरानगर, अंबड, गंगापूर, मुंबईनाका या भागातील लोकांची फसवणूक केली. अवैध सावकारी करत लोकांना व्याजाने पैसे देऊन त्या मोबदल्यात अवाच्या सव्वा दराने
वैभव देवरे व त्याच्या टोळीने फिर्यादीच्या हिरावाडीतील जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासविले. तसेच मौजे सारुळ येथील जमिनीचा व्यवहार तीन कोटी रुपयांत केला. या व्यवहारापोटी फिर्यादीकडून ६३ लाख ४९ हजार रुपये उकळले. तरीही फिर्यादीला कोणतीही जमीन नावावर करून दिली नाही.
व्याजाची वसुली करताना दमबाजी, जिवे ठार मारण्याची धमकी, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग, जबरी चोरी, खंडणीवसुली करत शहरात दहशत माजविली होती. या टोळीच्या छळाला कंटाळून गंगापूररोड भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने आत्महत्याही केली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हासुद्धा या टोळीवर दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत बोलतांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, “शहरात बेकायदेशीरपणे सावकारी चालविणाऱ्यांची माहिती पोलिस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मॅसेजद्वारे द्यावी. प्राप्त माहितीनुसार तातडीने कारवाई करण्यात येईल. तसेच पोलिस यंत्रणेलाही सूचना देण्यात आल्यास असून, अवैध सावकारी चालविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.”