नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतील दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे.
या संशयिताकडून वेगवेगळ्या कंपनीच्या सतरा दुचाकी असा एकूण साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार अनिल गुंवाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे, पोलिस नाईक नीलेश भोईर, संदीप मालसाने, पोलिस अंमलदार घनश्याम महाले, विष्णू जाधव, वैभव परदेशी हे गस्त घालत होते.
यावेळी त्यांना दोन संशयित नंबरप्लेट नसलेली दुचाकी घेऊन मेरी ऑफिसमध्ये संशयास्पद प्रवेश करताना दिसून आले, त्यांना हटकले असता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचवटी गुन्हे शोध पथकांच्या कर्मचाऱ्यांनी संशयित यश राकेश मांडवडे (वय १९, रा. चवगाव, नामपूर, सटाणा) व प्रशांत एकनाथ गावित (वय १९, रा. बाबापूर, मावडी, दिंडोरी) यांना ताब्यात घेतले.
या संशयितांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, दिंडोरी वणी पोलिस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीची कबुली दिली आहे.