नाशिक (प्रतिनिधी): कोपरगाव-शिर्डी रस्त्यावरील सावळीविहिर येथे पत्नी, मेहुणा व आजेसासू यांचा चाकूने वार करीत खून करून फरार झालेल्या दोघा संशयितांच्या नाशिकरोड पोलिसांच्या गस्ती पथकाने गुरुवारी (ता.२१) पहाटे शिंदे टोलनाका येथे सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या.
अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांना नगर स्थानिक गुन्हेशाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सुरेश उर्फ बाळू विलास निकम (३२), रोशन कैलास निकम (२६, दोघे रा. संगमनेर खुर्द, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
तर, वर्षा सुरेश निकम (२४), रोहित चांगदेव गायकवाड (२५), हिराबाई धृपद गायकवाड (७०, सर्व रा. सावळीविहिर, ता. राहता, जि. अहमदनगर) असे मयत झालेल्या पत्नी, मेहुणा व आजेसासूंची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर जिल्ह्यातील कोपरगाव-शिर्डी रोडवर सावळीविहिर गाव आहे. संशयित सुरेश निकम याचे वर्षा यांच्याशी ९ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.
परंतु किरकोळ घरगुती कारणातून विवाहिता वर्षा यांचे नेहमीच माहेरी निघून येणे त्यावरून दोन्ही कुटूंबियांमध्ये वाद होता. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी वाद होऊन पती सुरेश निकमविरोधात संगमनेर पोलीसात पत्नी वर्षा यांनी तक्रार दिल्याचे समजते.
दरम्यान, वारंवारच्या वादातून संतप्त झालेल्या संशयित सुरेश व त्याचा चुलत भाऊ रोशन यांनी बुधवारी (ता.२०) रात्री साडेअकरा वाजता सावळीविहिर गाठले. दरवाजाचा ठोठावला असता, दार उघडताच संशयित दोघांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी समोर येईल त्याच्यावर सपासप वार केले.
यात वर्मी घाव बसल्याने संशयित सुरेशची पत्नी वर्षा, मेहुणा रोहित आणि आजेसासू हिराबाई हे तिघे जागेवरच गतप्राण झाले तर सासरे चांगदेव गायकवाड, संगीता गायकवाड, योगिता गायकवाड हे गंभीररित्या जखमी झाले.
घरातील सर्व रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी दुचाकीवरून पोबारा केला. नागरिकांनी जखमींना तात्काळ शिर्डी रुग्णालयात दाखल केले. यावेळी तिघांना मयत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती कळताच शिर्डी पोलीस व नगर स्थानिक गुन्हेशाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
अशी झाली कारवाई:
नगर स्थानिक गुन्हेशाखेकडून नाशिक, संगमनेर, मनमाड, राहुरी, श्रीरामपूर पोलिसांना घटनेची माहिती देत संशयित त्या दिशेने येण्याची शक्यता वर्तविली. त्यानुसार या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली.
या संदेशाप्रमाणेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गस्तीपथक शिंदे टोलनाका येथे दबा धरून होते. गुरुवारी (ता.२१) पहाटे सव्वातीन-साडेतीन वाजेच्या सुमारास दोघे संशयित पल्सरवरून येत असल्याने पाहून पोलिसांनी दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी नाशिकच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पथकाने संशतियांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. संशयित जेरबंद केल्याची माहिती नगर स्थानिक गुन्हेशाखेला देण्यात आली. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संशयितांना सकाळी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी नाशिकरोडचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, उपनिरीक्षक रामदास विंचू, सुभाष घेगडमल, संदीप पवार, गोकूळ कासार, कल्पेश जाधव, भाऊसाहेर चत्तर, राजकुमार लोणारे यांनी बजावली.
आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुकत आनंदा वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांनी पथकाचे कौतूक केले.