Amazon

सिंहस्थ कुंभमेळा २०२७: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला NMA ची मंजुरी

नाशिक। दि. २३ ऑक्टोबर २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे. मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाने (National Monument Authority – NMA) मंजुरी दिली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. या निर्णयामुळे भाविकांची सुलभ वाहतूक, सुरक्षितता आणि मंदिर परिसरातील सुविधांच्या सुधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर व परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त, नाशिकचे जिल्हाधिकारी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वर मंदिर ३१ ऑक्टोबरला खुले राहणार; दर्शनासाठी पास बंधनकारक

चार प्रस्तावांवर सविस्तर चर्चा:
या बैठकीत राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाकडे सादर करण्यात आलेल्या मंदिर परिसरातील विकासकामांच्या चार प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये रस्ता दुरुस्ती, अत्याधुनिक प्रतीक्षा कक्ष व शौचालय सुविधा, आच्छादित मार्ग तसेच विधि भवन इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण या कामांचा समावेश होता.

सविस्तर चर्चेनंतर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला तात्काळ मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या कामाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असून, नियोजित कामांमधून रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती, रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करता येणार आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची वाहतूक अधिक सुलभ करण्यास मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नवमतदार नोंदणीसाठी अवघे चार दिवस शिल्लक; नाशिक जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त

उर्वरित तीन प्रस्तावांनाही सकारात्मक प्रतिसाद:
मंदिर परिसरातील भाविकांसाठी अत्याधुनिक प्रतीक्षा कक्ष व शौचालय सुविधा उपलब्ध करणे, आच्छादित मार्ग विकसित करणे तसेच विधि भवन इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरण करणे या उर्वरित तीन प्रस्तावांवरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या कामांसाठी आवश्यक तांत्रिक दस्तऐवज सादर केल्यानंतर पुढील अंतिम मंजुरी देण्यात येईल, असे राष्ट्रीय संस्मारक प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी दोन आठवड्यांत आराखडा द्या! उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला गती:
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा सक्षम करणे, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळणे यासाठी विविध विकासकामांचे नियोजन करण्यात येत आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामाला मिळालेली मंजुरी या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा असून, उर्वरित प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मंदिर परिसरातील सुविधांच्या विकासाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790