नाशिक (प्रतिनिधी): भद्रकाली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांच्या हाती महत्वाची सूत्रे लागल्याने दुचाकी चोरणाऱ्या टोळीपर्यंत पोलिसांना पोहचता आले असून, टोळीला मालेगाव येथून ताब्यात घेतले.
भद्रकाली पोलीस ठाण्यात (दि.१३ डिसेंबर) रोजी मोटार सायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असतांना गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला गुप्त बातमीदारातर्फे खात्रीशीर माहिती मिळाली कि, सदर गुन्हा करणारे संशयित आरोपी हे मालेगावमधील मनमाड चौफुली येथे चोरीच्या मोटार सायकली विकण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून, या संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्या जवळील ६५ हजारांची एक विना क्रमांकाची हिरो होंडा कंपनीची करिज्मा दुचाकी, ५५ हजारांची एक होंडा कंपनीची शाईन दुचाकी (एमएच १५ एफबी ७६२२), ५५ हजारांची एक होंडा कंपनीची लाल रंगाची शाईन (एमएच ४१ एजे-२०९३) व ३० हजार किंमतीचे ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले. तसेच अरबाज मोहम्मद हसन अन्सारी (वय २१), मोहम्मद रमजान मोहम्मद इब्राहिम अन्सारी (वय २२), मोहम्मद आदिल मोहम्मद अजमल अन्सारी (वय २२), मोहम्मद तोहीद अहेमद एजाज मोहम्मद अन्सारी (वय २४), इम्रान हसरत हुसेन अन्सारी (वय २५) हे सर्व संशयित आरोपी मालेगावचे रहिवाशी आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त दिपक पांडे, पोलीस उपआयुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक पोलीस आयुक्त खन्ना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, रघुराम शेगर इत्यादींनी केली.