नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बंद असलेल्या कंपनीच्या दरवाजाचे कुलूप तोडून नोकरानेच डिस्टिलेशन मशिनरी अॅसेंबलचे स्टील व लोखंड असे सुमारे 5 लाखांचे साहित्य चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी तुषार हिरालाल गगरानी (रा. वास्तुलाभ अपार्टमेंट, नाशिकरोड) यांची शिंदे-नायगाव रोडवर सोहम ऑर्गेनिक प्रा.लि. नावाची फार्मास्युटिकल कंपनी आहे. ही कंपनी अनेक दिवसांपासून बंद आहे.
या कंपनीची चावी त्यांच्याकडे कामास असलेल्या सलीम तडवी (रा. डेरिंगे पोल्ट्रीफार्मजवळ, नाशिकरोड) याच्याकडे गगरानी यांनी मोठ्या विश्वासाने दिली होती. त्या दरम्यान आरोपी तडवी याने दि.15 सप्टेंबर ते 23 डिसेंबर 2023 या कालावधीत स्वत:कडे असलेल्या चावीच्या माध्यमातून कंपनीचे कुलूप उघडून त्यात असलेले डिस्टिलेशन मशिनरी, अॅसेंबल केलेली मशिनरी व त्याचे स्टिल व लोखंडी साहित्य असे एकूण 4 लाख 96 हजार 500 रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले.
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी सलीम तडवीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी करीत आहे.