नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 करीता अचुक मतदार यादी तयार करणे व पात्र मतदारांची नोंदणी करुन घेण्यासाठी भारत निवडणुक आयोगाने 29 मे, 2023 च्या पत्रान्वये दि.1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केलेला आहे.
सदर कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी दिनांक 22 जानेवारी, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येणार होती. तथापि, महाराष्ट्र शासनाच्या दि.19 जानेवारी, 2024 च्या अधिसुचनेनुसार परक्राम्य संलेख अधिनियम, (1881 चा 26) च्या कलम 25 अन्वये दि. 22 जानेवारी, 2024 रोजी श्रीराम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
त्यामुळे, भारत निवडणुक आयोगाने त्यांच्या 19 जानेवारी 2024 च्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या मंगळवार 23 जानेवारी, 2024 रोजी प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
त्यानुसार निवडणुक आयोग व मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशान्वये, जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी प्रसिध्द करावयाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत असुन नाशिक जिल्ह्यातील अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी सोमवार दि. 22 जानेवारी ऐवजी मंगळवार दि. 23 जानेवारी, 2024 रोजी करण्यात येईल. तरी अंतिम यादी प्रसिध्दी करावयाच्या कार्यक्रमात झालेल्या बदलाची सर्वांनी नोंद घेण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले आहे.