नाशिकचे तब्बल २५०० कोरोना अहवाल प्रलंबित सध्या प्रलंबित आहेत. त्यामुळे आता स्थानिक लॅबमध्ये ६० हजार चाचण्या होणार आहेत.
नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील प्रमुख कोरोना हॉटस्पॉटमध्ये नाशिकचा समावेश झाल्यानंतर तसेच दिवसाला १२०० ते १५०० कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करून घेण्यासाठी पुण्यामधील लॅबला पाठवले गेलेले सुमारे अडीच हजारावर अहवाल प्रलंबित आहेत.
त्यामुळे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आता स्थानिक लॅबमार्फत तातडीने ६० हजार कोरोना चाचण्या करून घेण्याचे नियोजन केले आहे. दिवसाला सरासरी चार हजार कोरोना टेस्ट केल्या जाणार असून पहिल्या पायरीवर निदान झाल्यास घरगुती अलगीकरण करून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणे सोपे होण्याची शक्यता आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसाला आता १२०० ते १५०० च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिका इलेक्शन मोडवर आले असून ९१ सरकारी व खासगी रुग्णालय रुग्णवर उपचार करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.
महापालिकेने रुग्णांना सहजासहजी उपचार घेता यावे यासाठी सेंट्रल बेड रिझर्व्हेशन सिस्टिम कार्यान्वित केली असून पालिकेच्या हेल्पलाइनवर फोन केल्यानंतर आपल्या जवळ कोणत्या रुग्णालयांमध्ये आजाराच्या तीव्रतेनुसार बेड शिल्लक आहे का नाही याची माहिती मिळत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या पुरवण्या चाचण्या करणे गरजेचे झाले आहे.
याबरोबरच बाजारपेठेत सुपर स्प्रेडर ठरतील अशाही घटकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहे. सद्यस्थितीत या सर्व चाचण्यांचे अहवाल पुण्याला लॅबमध्ये पाठवले जात असून दोन हजारांहून अधिक अहवाल सायंकाळपर्यंत प्रलंबित होते. यातील काही रविवारी तर काही अहवाल सोमवारी मिळाले, मात्र यापुढे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे हे बघून स्थानिक पातळीवर चाचण्या करून घेण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने विविध लॅबकडून मागवलेल्या दरपत्रकानुसार सर्वात कमी दर घेणाऱ्या दातार लॅबला पुढील काळामध्ये कोरोना चाचणी करून घेण्यासाठी काम देण्याचे ठरले आहे.
दिवसाला सरासरी ४ हजार चाचण्या केल्या जाणार असून साधारण साठ हजार चाचण्यांच्या निधी खर्चाला पहिल्या टप्प्यात मान्यता दिली आहे.