🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

कर्जवसुलीसाठी येणाऱ्या रिकव्हरी एजंटला बसणार चाप; रिझर्व्ह बँकेकडून कठोर नियमावली

नवी दिल्ली। दि. १३ फेब्रुवारी २०२६: कर्ज थकबाकी वसूल करताना वापरल्या जाणाऱ्या दबावाच्या पद्धतींवर आता लगाम बसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली प्रक्रियेबाबत कडक मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला असून, वसुली एजंटांनी ग्राहकांशी सभ्य भाषेत संवाद साधणे आणि सर्व दूरध्वनी संभाषणांचे रेकॉर्डिंग ठेवणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

अलीकडेच बिहारमध्ये वसुली एजंटांच्या कथित त्रासामुळे एका कर्जदाराच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण घोषणेदरम्यान कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले होते. त्यानुसारच हा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर सलग ४१ तास खुले; तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद

काय असतील प्रमुख तरतुदी?

  • वसुली एजंटांनी सुसंस्कृत आणि मर्यादित वर्तन राखणे बंधनकारक
  • अपमानास्पद भाषा, धमकीचे संदेश किंवा अयोग्य वेळेला भेटींवर स्पष्ट बंदी
  • एजंट व त्यांच्या कर्मचाऱ्यांची पूर्वतपासणी (ड्यू डिलिजन्स) अनिवार्य
  • न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या कर्जप्रकरणांमध्ये विशेष सावधगिरीची अट
  • ग्राहकांची वैयक्तिक माहिती गैरवापर होऊ नये, याची जबाबदारी संबंधित बँकेवर
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

संवेदनशील प्रसंगी कारवाई टाळण्याचे निर्देश

घरातील मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, सण-समारंभ किंवा लग्नासारख्या प्रसंगी वसुलीची कारवाई करू नये, असा स्पष्ट निर्देश मसुद्यात देण्यात आला आहे. ‘अयोग्य प्रसंगी’ वसुली टाळण्यावर आरबीआयने विशेष भर दिला आहे.

माहितीच्या सुरक्षिततेवर बँकांची जबाबदारी

ग्राहकांचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवणे आणि त्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ न देणे ही जबाबदारी बँकांनी स्वीकारावी लागणार आहे. माहितीचा गैरवापर झाल्यास संबंधित बँकांवर कारवाईची तरतूद करण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पीयूसीसी सेवेसाठी वाहन मालकांचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाईल क्रमांक अनिवार्य

न्यायप्रविष्ट प्रकरणांत विशेष दक्षता

ज्या कर्जप्रकरणांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे, ती प्रकरणे वसुली एजंटांकडे देताना बँकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

नव्या नियमांमुळे कर्जवसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790