नाशिक (प्रतिनिधी): वा’दग्रस्त स्मार्ट बससेवा सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा हालचाली वाढल्या असून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता, परिवहन विभागाने भाडेदरावर शिक्कामोर्तब केले आहे. पहिल्या टप्प्यात १४६ मार्गांवर बसेस सुरू होणार असून त्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत प्रतिव्यक्ती दहा रुपये तर ५० किलोमीटर प्रवासासाठी प्रतिव्यक्ती ६५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
नाशिक शहरामध्ये गेल्या ६० वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासी सेवा दिली जात आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सेवा वर्ग करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने महापालिकेने अनेकदा सेवा ताब्यात घेण्याचा प्रस्तावदेखील सादर केला. परंतु, तो फेटाळण्यात आला होता.
फेब्रुवारी २०२१ शासनाने बससेवा परमिटसाठी परवानगी दिली. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीसमोर १४६ विविध मार्गांवर टप्पा वाहतुकीला परवानगी मिळण्याबरोबरच टप्पा दर मंजुरीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. मंगळवारी (दि. १) बैठक होऊन प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.