नाशिक (प्रतिनिधी): लोहोणेर (ता. देवळा) येथील जनता विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी मानसी घोरपडे व इयत्ता आठवीत शिकणारा भाऊ चेतन घोरपडे यांनी विद्युत प्रवाह उतरलेल्या तारेला चिकटलेल्या आई, वडिलांना धाडसाने व शौर्याने दोघांचे प्राण वाचविले.
बहिण, भावाने दाखविलेल्या धाडसाबद्दल शाळेने कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
तीन दिवसांपूर्वी लोहोणेर येथील मानसी घोरपडे हिची आई दीपाली या आपल्या राहत्या घरी सकाळी घरासमोर असणाऱ्या तारेवर टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या त्यांचा तारेला स्पर्श होऊन चिकटल्या.
यावेळी त्यांनी मदतीसाठी मोठ्याने आरडाओरड केला असता घरात असलेले त्यांचे पती शांताराम घोरपडे यांनी हा आवाज ऐकताच आपल्या पत्नीला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांनी पत्नीला हात लाऊन बाजूला करत असताना त्यांना देखील विजेचा शॉक लागला व ते देखील त्या तारेला चिकटले.
आई का ओरडत आहे हे पाहण्यासाठी मुलगी मानसी व मुलगा चेतन गेले असता आई व वडील हे दोघेही त्या लोखंडी तारेला चिकटलेले दिसले. यावेळी मुलगा चेतन घोरपडे याने मोठया धैर्याने व प्रसंगावधान दाखवत विद्युत प्रवाहाचा स्वीच बंद करत विद्युत प्रवाह खंडित केला. तर बहीण मानसी हिने घराचा दरवाजा उघडून लोकांना जमा केले.
यावेळी शेजारी मदतीसाठी तत्काळ धावले. त्यांनी दोघांना तारेपासून बाजूला करत लागलीच दवाखान्यात नेले. लवकर विद्युत प्रवाह बंद केल्याने व लागलीच वैद्यकीय मदत घेतल्याने दोघाही पती, पत्नीचे जीव वाचवल्याने भाऊ बहिणीने दाखविलेल्या प्रसंगावधान व धाडसाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक झाले.
विद्यालयाच्या वतीने मानसी व चेतन यांच्या धाडसाबद्दल व शौर्याबद्दल मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी, पर्यवेक्षक बी.एस.निकम आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी त्यांचे कौतुक केले.