नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलीसांकडून सातत्याने गावठी दारू, अवैध मद्यसाठाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. असे असतानाही नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकलहरा रोडवर नाश्त्याच्या हातगाड्यावरच अवैधरित्या मद्याची विक्री सुरू असल्याप्रकणी कारवाई करण्यात आली.
संशयिताकडून सुमारे साडेतीन हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्तीची कारवाई शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने केली. तर, इंदिरानगर परिसरातील वडाळागावातून अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आयुक्तालय हददीतील अवैध धंद्यांविरोधात कठोर धोरण अवलंबले असून, धडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असतानाही चोरीछुप्यारितीने अवैध मटका, जुगार आणि अवैधरित्या मद्याची विक्री सुरू असून त्याविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकलहरा रोडवरील एका हातगाड्यावर अवैधरित्या मद्याची विक्री केली जात असल्याची खबर शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनला मिळाली होती. त्यानुसार, युनिट दोनच्या पथकाने बुधवारी (ता. ५) एकलहरा रोडवरील सानप कॉम्प्लेक्ससमोरील साई नाश्ता सेंटर या नावाच्या हातगाड्यावर करडी नजर ठेवून सापळा रचला.
हातगाड्यावर चोरून अवैधरित्या मद्याची विक्री होत असल्याची खात्री पटताच पथकाने छापा टाकून संशयित मयुर गणेश खैरनार (३०, रा. प्रगतीनगर, सायखेडा रोड, जेलरोड) यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ३ हजार ७१० रुपयांचे प्रिन्स संत्रा देशी व विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, इंदिरानगर परिसरातील वडाळागावात साठेनगरमध्ये अवैध मद्यविक्री करताना एकाला ताब्यात घेतले. इंदिरानगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत भाऊराव बाळू बत्तीसे (३८, रा. साठेनगर, वडाळागाव, इंदिरानगर) याच्याकडून प्रिन्स संत्रा देशी दारुच्या ९८० रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई बुधवारी (ता.५) रात्री करण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()


