नाशिक (प्रतिनिधी): बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ सी नुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी शुक्रवार (दि. ११) पासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.
कोरोनाची दुसरी लाट आल्याने आरटीई प्रवेशप्रक्रियेला ब्रेक लागला होता. ७ एप्रिल २०२१ रोजी लॉटरी पद्धतीने निवड यादी तयार करण्यात आली होती. या यादीत नाव असणाऱ्या विद्यार्थ्याची प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांची मुदत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी तारीख आरटीई पोर्टलवर दिली जाईल. तारीख मिळाल्यानंतर पालकांनी मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रती घेऊन संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळेत प्रवेशासाठी येऊ न शकणाऱ्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनी, व्हाॅट्सअॅपद्वारे शाळेशी संपर्क साधून प्रवेशाची कार्यवाही करावी, अशा सूचना शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आल्या आहेत.