नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर परिसरातील खोडेनगरमध्ये ५०० किलो गोवंशा मांस विक्रीसाठी आणले असता, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली.
पिकअपसह गोवंशाचे मास असा ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अमीर असद कुरेशी (२७, रा. संगमनेर, जि. नगर), सलमान इकबाल कुरेशी (२८, रा. चौक मंडई, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथून पिकअपमध्ये मोठ्याप्रमाणात गोवंशाचे मांस विक्रीसाठी नाशिकमधील खोडेनगर येथे आणण्यात येणार होते.
सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिली असता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोडेनगर परिसरात पहाटेला सापळा रचण्यात आला.
गोवंशाचे मांस घेऊन पिकअप आला असता दबा धरून असलेल्या युनिट एकच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली. यावेळी पिकअपमध्ये ५०० किलो गोवंशाचे मांस आणण्यात आले होते.
ते संशयित अमीर कुरेशी याच्याकडून संशयित सलमान कुरेशी खरेदी करून मुंबई नाका, भद्रकाली, वडाळानाका याठिकाणी त्याची किरकोळ विक्री केली जाणार होती. पिकअप (एमएच १४ डीएम ३००६) व गोवंश मांस असा ८ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यता आला आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, मिलिंदसिंग परदेशी, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, किरण शिरसाठ यांनी बजावली.