नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी, ८ मेच्या रात्री पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने ती वेळेत निष्प्रभ करत मोठा धोका टाळला.
या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला. पाकिस्तानकडून अनेक फायटर जेट्स भारताच्या दिशेने झेपावली, त्यापैकी किमान एक लढाऊ विमान भारतीय लष्कराने राजस्थानमधील जैसलमेर परिसरात पाडले आहे.
भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर संबंधित फायटर जेटमधील पाकिस्तानी पायलटने इजेक्शनद्वारे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो भारतीय सुरक्षादलांच्या ताब्यात सापडला. बीएसएफच्या क्विक रिस्पॉन्स टीमने या पायलटला ताब्यात घेतले असून, त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, न्यूज एजन्सी ANI ने दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोट येथेही भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या हवाई दलाचे आणखी एक फायटर जेट पाडले आहे. ही माहिती विविध संरक्षण स्रोतांच्या हवाल्याने देण्यात आली असून, यासंदर्भात अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
याआधी, २२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ६ आणि ७ मेच्या दरम्यानच्या रात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली होती. या कारवाईत अनेक तळ उद्ध्वस्त झाले असून, मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
पाकिस्तानने त्यानंतर ७ आणि ८ मेच्या रात्री भारतातील १५ शहरांवर मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई संरक्षण व्यवस्थेने (Air Defence System) सर्व हल्ले निष्प्रभ केले. त्यानंतर ८ मेच्या सकाळी भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला. रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, पण भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टमने तो पुन्हा हाणून पाडला.