नाशिक (प्रतिनिधी): मूर्तिकार, साठवणूकदार, विक्री करणाऱ्यांकडे प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्तीचे विसर्जन महापालिकेच्या कृत्रीम तलावात पाचव्या दिवशीच करावे अशा सूचना महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. त्यात नदी प्रदूषण व नुकसान टाळण्याकरिता प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने देखील बंदी कायम केली आहे.
या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मुर्तीनिर्मिती, आयात, साठा बंदीबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे सुधारित मुर्ती विसर्जनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी बंधनकारक आहे.
महापालिका क्षेत्रात उपलब्ध असलेल्या सर्व मुर्त्यांचे विसर्जन पाचव्या दिवशी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रीम तलावात करण्याच्या सूचना आहेत. सूचनेप्रमाणे कारवाई न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे पर्यावरण उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी सांगितले.