नाशिक, २३ मे २०२५: यंदा राज्यभरात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवार, दि. २१ मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे व पसंतीक्रम नोंदणीस सुरुवात होणार होती; मात्र नोंदणीसाठी संकेतस्थळ सुरूच न झाल्याने प्रवेश प्रक्रिया खोळंबलेली होती. अखेर शिक्षण संचालनालयाने याबाबत वेळापत्रक जाहीर करीत ही प्रक्रिया २६ मे पासून सुरू होणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे सर्वच फेऱ्या आपोआप पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील शाळांमध्येच अकरावी प्रवेश ऑनलाइन माध्यमातून केले जात होते; मात्र यावर्षीपासून सर्वच शाळांचे प्रवेश ऑनलाइन माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन प्रवेशामुळे विद्यार्थी काही शाळांनाच प्राधान्य देतात. त्याचा परिणाम अन्य शाळांच्या प्रवेशावर होतो, असा आक्षेप शिक्षण संस्थाचालकांनी घेतला होता. राज्यात अकरावीच्या रिक्त जागांची संख्याही वाढली होती; परंतु त्यानंतरही यावर्षीपासून शासनाने सर्वच शाळांचे अकरावी प्रवेश हे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी १७ मेपर्यंत सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणीही संकेतस्थळावर करण्यात आली.
गेल्या वर्षी अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या, सहा विशेष फेऱ्या आणि आणखी दोन अतिरिक्त फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी बहुतांश जागा रिक्त राहिल्या होत्या.
नवे वेळापत्रक असे:
२६ मे ते ३ जून : ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
५ जून : प्राथमिक गुणवत्ता यादी
६ ते ७ जून : अर्जात बदल करण्यासाठी मुदत
८ जून : प्राथमिक गुणवत्ता यादी
९ जून : कोटा अॅडमिशन, कॅप राउंड वन
१० जून : कॅप राउंड दोन
११ ते १८ जून : यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया
२० जून : शिल्लक जागांसाठी प्रक्रिया