
नाशिक (प्रतिनिधी): अंमली पदार्थविरोधी पथकाने नोव्हेंबर २०२३ ते १६ मे २०२५ या कालावधीत केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. पथकाने शहर व परिसरात एमडी. गांजा, चरस, आणि भांग विक्री करणारे तस्करांसह सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत ७३१ ग्रॅम एमडी, २९२ किलो गांजा, ४९ ग्रॅम चरस, ३२६ किलो भांग जप्त करण्यात आली. याकारवाईत १२७आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईची दखल घेत पोलिस आयुक्तांनी पथकाचे प्रशस्ती पत्रक देत सन्मान केला.
अमली पदार्थविरोधी पथकाकडून शहरात एमडी, गांजा, तस्करांवर कारवाई सुरू आहे. पथकाकडून सात महिन्यांत ३४ लाख ६० हजारांचे ७३१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करत ५८ पेडर्सला अटक केली. ४८ लाख ८९ हजारांचा २९२ किलो गांजा जप्त करण्यात येऊन ३८ गांजा तस्करांना गजाआड केले. ड्रग्ज मध्ये सर्वाधिक महागडे ४९ ग्रॅम चरस जप्त केले.
भांगेचा कारखाना उद्ध्वस्त करत ३ लाख २६ हजारांची ३२६ किलो भांग जप्त करण्यात आली. पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे, सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, पथकातील अमलदारांना प्रशस्तिपत्र दिले.

‘मॅक्स’चा विशेष सन्मान:
एमडी ड्रग्ज शोधण्यास महत्त्वाची भूमिका बजावणारा श्वानपथकातील मॅक्सचा पोलिस आयुक्तांच्या शेजारील खुर्चीवर बसवत विशेष सन्मान करण्यात आला, हॅण्डलर, विलास पवार, गणेश कोंडे यांनी सन्मान स्वीकारला.