नाशिक | १६ नोव्हेंबर २०२५: शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारी सकाळपासून जाणवलेल्या गारठ्यामुळे थंडीची लाट असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. निफाडमध्ये आज (दि. १६) किमान तापमान ८ अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये १०.१ अंशांपर्यंत घसरत हंगामातील नीचांकी तापमान नोंदविले गेले. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपड्यांसोबत शेकोट्यांचा आधार घेतल्याचे दृश्य शहरात अनेक ठिकाणी दिसले. शनिवारी कमाल तापमानात झालेल्या घसरणीचा परिणाम रविवारीही जाणवून दिवसभर वातावरण गारठलेलेच राहिले.
शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात तापमानात झपाट्याने घट होत असून मध्यरात्रीनंतर नाशिक व परिसरात हलक्या धुक्याची चादर पसरली होती. दिवसभरातही कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी कमी असल्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीला हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र झाली आहे.
पुढील तीन दिवस वाढता कडाका:
शनिवारी पहाटेच थंडीचा जोरदार बडगा नागरिकांनी अनुभवला. दिवसाही गारवा कायम राहिल्याने पुढील काही दिवस तापमानातील घसरण कायम राहील, असा अंदाज हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. गेल्या आठवडाभरात कमाल तापमान २७ ते २९ अंशांदरम्यान नोंदवले जात असले तरी याआधी ते ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत जिल्ह्यात थंडीचा कडाका अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
![]()
