नाशिक। दि. ७ ऑगस्ट २०२५: श्रावणातील तिसऱ्या सोमवारी (दि. ११) ब्रह्मगिरीला फेरीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने २७० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर चालत असलेल्या १६० फेऱ्यांव्यतिरिक्त या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
तिसऱ्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर १० आणि ११ ऑगस्टला भाविकांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. १०) सकाळी ८ वाजता ते सोमवारी (दि. ११) रात्री गरजेनुसार नवीस सीबीएस (ठक्कर) येथे बसेसचे नियोजन केलेले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील साध्या बसचे तिकीट दर ५१ रुपये तर ई-बसचा तिकीट दर ७३ रुपये आहे. भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी केले आहे.
अशी आहे बसची संख्या: नाशिक ते त्र्यंबक – १९०, अंबोली ते त्र्यंबक – १०, पहिने ते त्र्यंबक १०, घोटी ते त्र्यंबक – १०, खंबाळे ते त्र्यंबक – ५०