नाशिकच्या गिर्यारोहणातील पितामह हरपला… अविनाश जोशी यांचे निधन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील प्रसिद्ध गिर्यारोहक अविनाश जोशी उर्फ जोशीकाका यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

अविनाश जोशी हे तमाम गिर्यारोहकांमध्ये जोशी काका या नावाने प्रसिद्ध होते. महाराष्ट्र शासनाच्या शेतकी खात्यात त्यांनी नोकरी केली. वयाच्या विसाव्या वर्षांपासून गिर्यारोहणाशी त्यांचा संबंध आला होता. सुरुवातीला युथहोस्टेलच्या माध्यमातून सुरु केलेल्या गिर्यारोहणानंतर नाशिकला हक्काची गिर्यारोहण संस्था असावी असा विचार अविनाश जोशी यांनी समविचारी मंडळींसमोर ठेवला. त्यातून १९८५ साली वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण या संस्थेची त्यांनी स्थापना केली. वैनतेयचे कार्य आजही अखंड सुरू आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ दरम्यान झाले इतके टक्के मतदान…

अनेक संस्था आणि गिर्यारोहकांना मार्गदर्शन आणि उभारी देण्याचे कामही अविनाश जोशी केले. जोशी काका म्हणजे नाशिककर गिर्यारोहकांच्यामांदियाळीतील एक ठळक नाव होते. नाशिककर गिर्यारोहक त्यांना आदर्श आणि गुरुस्थानी मानत असत. महाराष्ट्रातील अनेक किल्ले आणि डोंगररांगांवरून मुक्त भटकंती तर केलीच होती परंतु नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध-अप्रसिद्ध गड-किल्ले किंवा अज्ञात डोंगर, डोंगरवाटा, घाटवाटा आणि गावं यांचा खडान् खडा माहितीची शिदोरी कमावलेली होती. नवा-जुना कुठलाही गिर्यारोहक असो, अविनाश जोशींच्या या शिदोरीतून सतत अनुभवांचे वाटप करत राहायचे. त्यांच्या गेल्या अर्धशतकी गिरिभ्रमंतीतून गोळा झालेला ह्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा प्रत्येक जिज्ञासूगिर्यारोहकाला सतत उपयोग होत असतो. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यांत राहणारे शेकडो ग्रामस्थ आणि आदिवासी बांधवांशी त्यांचे ऋणानुबंध होते. आजही कुठल्याही गडाच्या पायथ्याशी काकांचे नाव माहिती असलेला एक तरी ग्रामस्थ सापडतोच.

हे ही वाचा:  नाशिक: एसटी व ट्रकचा अपघात; दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

अखिल महाराष्ट्रातील गिर्यारोहकांचाकुंभमेळा म्हणजेच मुंबई येथील गिरिमित्र संमेलन होय. गिरिमित्रच्या सतराव्या संमेलनात अविनाश जोशी यांना ‘गिरिमित्रजीवनगौरव पुरस्कार २०१८’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैनतेय या नाशिकमधील घरच्या संस्थेतर्फेही अविनाश जोशी यांचा जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला होता. नाशिकमधील सिनर्जी फाऊंडेशन तर्फे त्यांना गिर्यारोहण क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला होता.

वयाचे पंचाहत्तर वर्षे पार केल्यानंतर डॉक्टरांकडून त्यांना ‘ही भटकंती आता पुरे’ म्हणून सल्ला दिला गेला होता. तरी डोंगरमयझालेलं त्यांचं आयुष्य घरी रमलं नाही, अगदी गेल्या पंधरवाड्यापर्यंत त्यांनी मित्रमंडळींसमवेत मोठा ट्रेक पूर्ण केला. गिर्यारोहणाच्या क्षेत्रातून ‘पैसा आणि प्रसिद्धी’ या दोन गोष्टींना त्यांनी दोन हात दूरच ठेवलेले होते. अविनाश जोशी म्हणजे नाशिकच्या गिर्यारोहणातील ‘पितामह’ असं म्हटलं तरी अतिशयोक्ति नसावी ! महाराष्ट्रातील संपूर्ण गिर्यारोहण क्षेत्र त्यांच्या निधनाने हेलावला असून राज्यभरातीलगिर्यारोहक शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली अंजली, स्वाती, वैशाली, स्मिता तसेच जावाई, नातवंड असा परिवार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790