Amazon

सप्तशृंगगडाच्या बसेस आता अशोकस्तंभ मार्गे धावणार; ९ ते २६ ऑक्टोबरदरम्यान वाहतूक मार्गात बदल

नाशिक। दि. ९ ऑक्टोबर २०२६: सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सवाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या काळात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे २५० बसेस गडाकडे धावणार आहेत. दरम्यान, मुंबईनाका परिसरात कालिका माता यात्रोत्सवही सुरू होत असल्याने शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सप्तशृंगगडाच्या बसेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या बसेस आता अशोकस्तंभ आणि रविवार कारंजा मार्गे धावणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  अंबड दुषित पाणी प्रकरण: प्रदुषण नियंत्रणाचे नियम न पाळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

यासंदर्भात शहर वाहतूक पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी १९ सप्टेंबरपासून अनेक मार्गांवरील बसेस त्र्यंबकनाका, खडकाळी सिग्नल, सारडा सर्कल, मदिना चौक, मुंबईनाका, वडाळानाका आणि द्वारका मार्गे सोडण्यात येत होत्या. मात्र, सप्तशृंगगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ९ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत वाहतुकीचे नियोजन बदलण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर बाजारातील भरघोस परताव्याचे आमिष दाखवून ७५ लाखांचा ऑनलाइन गंडा

नवीन ठक्कर बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसचा मार्ग:
नवीन ठक्कर बसस्थानकातून सप्तशृंगगडाकडे जाणाऱ्या बसेस मेहेर सिग्नल, कारंजा आणि नाका मार्गे जातील. गडावरून नाशिककडे परतणाऱ्या बसेस अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा आणि दिंडोरी नाका मार्गे धावतील.

गडावरून नाशिकला येणाऱ्या बसेससाठीही बदल:
सप्तशृंगगडावरून नाशिकमध्ये येणाऱ्या बसेस दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, शालिमार, खडकाळी सिग्नल आणि त्र्यंबकनाका मार्गे नवीन मध्यवर्ती बसस्थानकात (नवीन सीबीएस) दाखल होतील, अशी माहिती शहर वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टपाल विभागातर्फे 9 ऑक्टोबर रोजी पेन्शन अदालतचे आयोजन

नवरात्रोत्सव आणि कालिका माता यात्रोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे बदल करण्यात आले असून, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांची नोंद घ्यावी.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790