नाशिक (प्रतिनिधी): राज्यासह नाशिकच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली असून बुधवारी शहराचे कमाल तापमान ३८. ७ अंशावर गेले होते. आतापर्यंतची ही सर्वाधिक उच्चांकी नोंद ठरली आहे.
शहर व परिसरात मागील तीन दिवसांपासून सातत्याने उन्हाच्या झळा अधिकाधिक तीव्र झाल्याचे जाणवत आहे. यामुळे नाशिककर वाढत्या उष्याने त्रस्त झाले आहे.
आठवडाभरापासून नाशिक शहर व परिसरात हवामानात कमालीचा बदल झालेला अनुभव नागरिकांना येत आहे. कमाल तापमानामध्ये अचानकपणे वाढ होण्यास सुरुवात झाली आणि ३३ अंशांवरून तापमान थेट ३७ अंशांच्याही पुढे गेले. मार्च महिन्याचे दहा दिवस होत नाही, तोच प्रखर उन्हाची तीव्रता आल्हाददायक वातावरणाच्या शहरात जाणवू लागल्यामुळे येणाऱ्या एप्रिल व मेमध्ये उन्हाच्या दाहकतेची कल्पना करणेही अवघड असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
कमाल तापमानासह किमान तापमानामध्येही वाढ होत असल्याने रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. बुधवारी किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. बुधवारी नागरिकांना झळांचा अधिकच चटका बसला. रस्त्यांवर दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहावयास मिळाला.