नाशिक (प्रतिनिधी): तालुका पोलिसांनी दुगाव येथे बुधवारी (ता. ६) मध्यरात्री कारमधून ३३ लाखांची रोकड जप्त केली. रोकडचा तपशील न देता आल्याने पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याची माहिती निवडणूक कक्षाला दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर-जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथकांचे पॉइंट निश्चित केले आहेत. तेथे वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. नाशिक तालुका ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आमले व पथक बुधवारी (ता. ६) रात्री दुगाव येथे वाहनांची कसून तपासणी करीत होते. तेथे कारची तपासणी केली असता, त्यात ३३ लाखांची रोकड मिळून आली. कारमधील दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र, त्यांना नोटांचा कोणताही तपशील देता आला नाही.
त्यामुळे ती रक्कम जप्त केली आहे. याबाबत एसएसटी पथकातील अधिकाऱ्यांनी निवडणूक कक्ष व प्राप्तिकर विभागाला माहिती दिली आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.