नाशिक (प्रतिनिधी): साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी गडावरील चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगीदेवीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक सप्तशृंगीगडावर येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने ५ ते १३ एप्रिल या कालावधीत नवीन सीबीएस, मालेगाव, मनमाड, नांदगाव, सटाणा बसस्थानकातून तब्बल २५० जादा बस सोडण्यात येणार आहेत.
शहरातील नवीन सीबीएस बसस्थानकातून सप्तशृंगीगडावर जाण्यासाठी ६५ बसेस प्रत्येक १५ मिनिटांच्या वारंवारितेने धावतील. मालेगाव येथून ४५ बसेस दर २० मिनिटांनी, मनमाड येथून १५ बसेस दर ३० मिनिटांनी तर सटाणा येथून ५ बसेस दर एक तासाच्या वारंवारितेने धावतील.
एसटी प्रवासी वाहतूक सेवा २४ तास असणार आहे. भाविकांची गर्दी बघून त्यात वाढही करण्यात येणार आहे. यासोबतच, नाशिक सप्तशृंगीगड या मार्गावर ई-बसच्या प्रतिदिन ३६ फेऱ्या होतील. दरम्यान, वणी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन सीबीएस बसस्थानक, नांदुरी पायथा वाहनतळ व सप्तशृंगीगड वाहनतळ परिसरात एसटी महामंडळाच्या वतीने यात्रा वाहतूक केंद्राची स्थापना केली जाणार आहे.