नाशिक (प्रतिनिधी): शहरात वाढत असलेली कोरोनाबाधीतांची संख्या बघता आता पंचवटी, नवीन नाशिक(सिडको) आणि शिंगाडा तलाव परिसरातील व्यावसायिकांनीही आपली दुकानं स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पंचवटी परिसरात मंगळवारपासून आठ दिवस तर शिंगाडा तलाव परिसरातील दुकानं रविवारपर्यंत बंद ठेवण्याचे ठरले आहे. तर नवीन नाशिक परिसरात २४ जून ते २८ जून दुकानं बंद असणार आहेत
“आम्ही जबाबदार नाशिककर आहोत, अर्थव्यवस्था महत्वाची असली तरीही आमच्या आणि आमच्या ग्राहकांच्या जीवाची आम्हाला जास्त काळजी आहे,” असे दुकानदारांनी यानिमित बोलून दाखवले ! प्रशासनाने लॉकडाऊन पुन्हा करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अनलॉक सुरु झाल्यापासून नाशिक शहरातील कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील रविवार कारंजा, मेन रोड परिसरातील व्यावसायिकांनी सर्वप्रथम स्वत:हून दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून गर्दी कमी होईल आणि संसर्गालाही आळा बसेल. आता या पाठोपाठ पंचवटी आणि शिंगाडा तलाव परिसरातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिंगाडा तलाव परिसर हा कार डेकोरेटर्ससाठी प्रसिद्ध आहे.