नाशिक (प्रतिनिधी): नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकपदी पालघर जिल्ह्याचे पाेलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांची बृहन्मुंबईत मध्य प्रादेशिक विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी बदली झाली होती. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यापदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान, शुक्रवारी (दि.१६) राज्य शासनाने राज्यातील भारतीय पोलिस सेवेतील चौदा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
त्यामध्ये नाशिक ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचाही समावेश होता. देशमाने यांनी नाशिक पोलिस अधिक्षकपदाचा फेब्रुवारी २०२४ मध्ये पदभार स्विकारला होता. त्यानंतर आज पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश जारी करण्यात आले होते.