नाशिक (प्रतिनिधी): राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे संकट घोंगावत असून भारतीय हवामान विभागाने (IMD) आज २२ मे रोजी दुपारी २.०३ वाजता जारी केलेल्या इशाऱ्यानुसार पुढील पाच दिवस कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर कर्नाटक- गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात एक चक्रीय स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं पुढील 12 तासांत तिथेच कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. पुढील 36 तासात उत्तरेकडे सरकत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनांसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी वर्तवली आहे.
येत्या पाच दिवसांसाठी कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी:
रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मेघगर्जनांसह पावसासोबतच वाऱ्याचा वेग देखील 50 ते 60 किमी प्रति तास राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धुळे, नंदूरबार, सांगली, जालना, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक आणि घाट माथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अहिल्यानगर, पुणे, बीड, कोल्हापूर आणि सातारा, संभाजीनगर, सोलापूर या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.