नाशिक (प्रतिनिधी): रजनिश शैलेंद्र गायकवाड या नाशिकच्या युवा खेळाडूने गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत दैदिप्यमान यश मिळवलं आहे. आपल्या सर्व गुरुवर्यांना सातासमुद्रापार कझाकस्थान या ठिकाणी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आयर्न मॅन किताब जिंकुन खरीखुरी गुरुदक्षिणा दिली आहे.
सरावातील कमालीचे सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन हा त्रिवेणी संगम आणि सुवर्ण कांचनयोग जुळून आल्याने रजनिश या आयर्न मॅन स्पर्धा 13 तास 47 मिनिटे अशा खूपच चांगल्या वेळेत यशस्वी पणे पूर्ण करून सदर स्पर्धेत आपल्या वयोगटात द्वितीय क्रमांकाचा किताब जिंकला आहे.
दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम. उत्तम नेतृत्व, संघबांधणी आणि अक्षय्य आशीर्वाद यांच्या पाठबळावर रजनीश शैलेंद्र गायकवाड याने आयर्न मॅन या एका अवघड स्पर्धेची तयारी सुरु केली होती. नाशिक शहराला डोंगरमाथ्यांची तटबंदी, पर्जन्यवृष्टीचे वरदान, चोहोबाजूंनी फळफळावळाचे वेढे यामुळे निसर्गदत्त लाभलेलं आल्हादायक वातावरण खेळाडूंना पोषकच! एकेकाळी थंड हवेचे ठिकाण अशीच ओळख असलेल्या नाशिक शहराला आता ‘विक्रमांचे शहर’ ही नवीन ओळख लाभलेली आहे .
आयर्न मॅन ट्रायथलॉंन:
ही WTC म्हणजेच वर्ल्ड ट्रायथलॉंन कॉर्पोरेशन यांनी आयोजित केलेली स्पर्धा असून यामधे ३.८६ कि.मि.(२.४ माईल्स) पोहणे, १८०.२५ कि.मि. (११२ माईल्स) सायकलिंग आणि ४२.२० कि.मि.(२६.२२ माईल्स) धावणे याचा समावेश आहे.प्रचंड शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागणाऱ्या या आयर्न मॅन स्पर्धेला जागतिक स्तरावरील सर्वात कठीण एक दिवसीय स्पर्धा असे म्हणतात. बहुतांशी आयर्न मॅन स्पर्धेचा कालावधी हा १७ तासांचा मानला जातो आणि वेळेत पूर्ण करणे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य मानले जाते. अतिशय खडतर अशी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करणे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असते.
जगभरात अनेक देशांमधे ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी जगभरातून अनेक ऍथलीट या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिवसरात्र झटत असतात. वयाची कोणतीही अट नसल्याने आज ‘स्त्री आणि पुरुष’ दोघेही या खेळाकडे आकृष्ट झाले आहेत, हे विशेष! आजही उत्तम नैसर्गिक ह्वामानाच्या सानिध्यात अनेकजण धावणे, सायकलिंग आणि पोहणे या तीन प्रकारात प्रामुख्याने नाशिक शहराचे नाव अग्रेसर ठेवण्यात व्यस्त आहेत, जी निश्चितच अभिमानाची, औत्सुक्याची आणि आशादायी बाब होय!
आज प्रत्येक खेळाडूला मोहवणारी ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धाच मुळात एवढी खडतर असून मन आणि शरीर याचा कस पणाला लावणारी आहे की फार कमी स्पर्धकांना यात यश संपादित करता आलेले आहे. किमान नाशिक शहराला तरी ‘आयर्नमॅन’ या स्पर्धेचं आकर्षण निर्माण करण्यात याआधी आयर्न मॅन किताब मिळविणाऱ्या खेळाडूंचा फार मोठा सहभाग दिसून येतो. त्यात विशेषतः राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी रुजू असलेले आयर्न मॅन डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी नाशिक शहराला आयर्न मॅन बाबत अधिक प्रचार आणि प्रसाराची भूमिका लाख मोलाची ठरते..
सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ व समुपदेशक डॉ. शैलेंद्र गायकवाड व डॉ. सौ. मिनल गायकवाड यांचा सुपुत्र रजनीश याने आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेण्याची प्रेरणा आयर्नमॅन डॉ. रविंद्र कुमार सिंगल(IPS) व आयर्नमॅन विजय काकड यांच्याकडून घेतली. वडील डॉ. शैलेंद्र गायकवाड यांच्यासोबत सराव करतांना रजनीशला आयर्नमॅन आश्विनी देवरे आणि डॉ. मनीषा रौंदळ यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले. गेल्या वर्षी याच कझाकस्थान या ठिकाणी आयोजित केलेल्या आयर्न मॅन स्पर्धेत नाशिक शहराचे नांव उंचाविणारे बॉश कंपनीत मुख्य सुरक्षा अधिकारी या पदावर कार्यरत असलेले आयर्न मॅन विजय काकड यांच्या यशाच्या प्रवासामुळे प्रभावित झाल्यामुळे रजनिशने यांच्याकडून या स्पर्धेत आवश्यक बाबींचा अभ्यास करून घेतला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार साताऱ्याचे सुप्रसिद्ध कोच श्री शिव यादव यांच्याकडून या स्पर्धेकरिता प्रशिक्षण घेतले. रजनिश ने दररोज किमान दोन तास आणि शनिवार व रविवारी किमान 5 ते 6 तास स्विमिंग, सायकलिंग, रनिंग या व्यतिरिक्त योगासन, स्ट्रेनथ ट्रेनिंग असे खडतर प्रशिक्षण हे नित्यनियमाने पूर्ण केले.
आपल्या कॉलेजच्या शिक्षण व विविध सामाजिक कार्यात कार्यरत असूनही आयर्न मॅन साठी लागणाऱ्या सराव करण्यात रजनीशचा पुढाकार कौतुकास पात्र ठरतो.