रेल्वे अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत नियोजनाची माहिती
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक ते पुणे या २३५ किलोमीटरच्या सेमी हायस्पीड डबल लाइन कॉरिडॉर प्रकल्पासाठी नाशिकरोड स्थानकावर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या प्रस्तावित मार्गावर दोन्ही बाजूंनी एकूण २४ वंदे भारत ट्रेन धावतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक-पुणे हा प्रवास अतिशय कमी वेळेत पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय आणि मुंबईतील मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे यांच्यासोबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तपशीलवार प्रकल्प अहवालाबाबत चर्चा केली.
या कॉरिडॉरमध्ये सुरुवातीला २४ वंदे भारत ट्रेन आणि २ इंटरसिटी गाड्या धावतील, तसेच त्यांचा वेग हा प्रतितासी २०० किलोमीटर रहाणार आहे. रोलिंग स्टॉकची देखभाल व नाशिकमधील मेगा कोचिंग टर्मिनलच्या संकल्पना आराखड्यावरही सूचना आणि प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी चर्चा केली. या प्रकल्पासाठी १६ हजार ३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.