नाशिक (प्रतिनिधी): अतिशय महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे करिता भूसंपादनाची महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा या परिसरात तब्बल २६ हेक्टरपेक्षा अधिक जमीन यासाठी संपादित करणे प्रस्तावित असून त्यासाठी जमीनमालक शेतकऱ्यांना सूचना किंवा हरकती सादर करण्याकरता १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त खर्चातून हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प साकारला जाणार अाहे. नुकतीच राज्य शासनाच्या हिश्श्याच्या निधीला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांमधील अंतर अवघ्या दोन तासांवर येणार आहे. यामुळे नाशिक सिन्नर आणि परिसरातील विकासाचा मार्ग सर्वच बाजूने खुला होणार आहे.
केंद्र शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून राज्य शासनाने देखील त्यांच्या वाट्याच्या निधीला मंजुरी दिली आहे. आता प्रत्यक्षात भूसंपादनासाठी जवळपास ११३ शेतकऱ्यांची जमीन आवश्यक असून त्यांना जाहीर नोटिसीद्वारे प्रशासनाने सूचना किंवा हरकती सादर करण्यास सांगितले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील भूसंपादन हा पहिला टप्पा असून तो पूर्ण झाल्यानंतर साधारणत: अडीच ते तीन वर्षात हा संपूर्ण प्रकल्प मार्गी लागणार आहे.
विद्युतीकरणासाठी होणार भूसंपादन
महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन आणि महसूल प्रशासन यांच्याकडून जमीन मालक शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटी करून ही जमीन संपादित केली जाणार आहे. रेल्वे मार्ग तसेच त्या बाजूचे विद्युतीकरण यांचा या भूसंपादनाची संबंध असल्याचे भूसंपादन नोटिशीत उल्लेख करण्यात आला आहे.