नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पोलिस कर्मचारी, अधिकारीदेखील बाधित होत आहेत. या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तत्काळ उपचारासाठी जागा मिळावी यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी (दि. २२) या सेंटरचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कोविड सेंटरमध्ये १०० खाटा उपलब्ध असून सहा ऑक्सिजन बेड आहेत. एकाचवेळी ६० पुरुष आणि ४० महिला येथे उपचार घेऊ शकतात. पोलिस आयुक्त पांडेय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम प्राधान्य पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी १९ सप्टेंबर २०२० रोजी कोविड सेंटर सुरू केले. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर रुग्णसंख्या घटली होती. यामुळे हे सेंटर बंद करण्यात आले होते. आता प्रादुर्भाव वाढत असून बाधित रुग्णांना तत्काळ बेड उपलब्ध व्हावे यासाठी हे सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त पांडेय, उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात, पौर्णिमा चौघुले, सहायक आयुक्त समीर शेख, प्रदीप जाधव, दीपाली खन्ना, सीताराम गायकवाड, सोहेल शेख, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे आणि सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत देवरे आदी उपस्थित होते.