नाशिक | २३ मे २०२५: नाशिक शहर व परिसरात सध्या वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यासंदर्भात महावितरणने ग्राहकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत वीजबंदीसाठीचे कारणे स्पष्ट केली असून, तक्रार नोंदवण्यासाठी विविध पर्यायांची माहिती दिली आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असतात. मात्र, यंत्रणा उघड्यावर असल्याने वादळी वारे, पावसामुळे झाडे-फांद्या तुटणे, आकाशातील विजांचा परिणाम, तसेच यंत्रणेत तांत्रिक बिघाड निर्माण होतो. अशा वेळी काही भागांत वीजपुरवठा तात्पुरता खंडित करावा लागतो.
महावितरण दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यांत पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीची नियोजित कामे हाती घेतो. झाडांच्या फांद्या कापणे, विद्युत वाहिन्यांची तपासणी, आणि उपकरणांची देखभाल यासाठी टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा थांबवावा लागतो. त्यामुळे याकाळात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
बिघाड झाल्यास सर्वप्रथम पर्यायी यंत्रणेद्वारे वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, बिघाड मोठा असेल तर दुरुस्तीस वेळ लागतो. वीजपुरवठा थांबल्यावर उपकेंद्रांमधील कर्मचारी त्वरित तपासणी करतात. फिडर पुन्हा ट्रिप झाला, तर बिघाड असल्याचे निश्चित मानले जाते आणि संपूर्ण तपासणीची प्रक्रिया सुरू होते.
ग्राहकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करून तक्रार करण्यापेक्षा, खालील डिजिटल व अधिकृत मार्गांचा वापर करून तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे:
तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत पर्याय
✅ मोबाईल अॅप
Mahavitaran चे अॅप Google Play Store, Apple App Store आणि Windows Store वर उपलब्ध आहे. या अॅपद्वारे वीजबिल, तक्रार नोंदणी, अपडेट्स मिळवता येतात.
✅ ऊर्जा चॅटबॉट
www.mahadiscom.in संकेतस्थळ किंवा अॅपवर उजव्या बाजूला असलेल्या “ऊर्जा” चॅटबॉटद्वारे ग्राहक क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून तक्रार नोंदवता येते.
✅ टोल फ्री क्रमांक
- 1912
- 1800 233 3435
- 1800 212 3435
हे नंबर २४x७ सक्रिय असून ग्राहक सेवा केंद्राद्वारे आपली तक्रार नोंदवली जाते.
✅ मिस्ड कॉल सेवा
नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यासही तक्रार नोंदवता येते.
✅ SMS सेवा
आपण NOPOWER <ग्राहक क्रमांक>
असा संदेश 9930399303 या क्रमांकावर पाठवून वीजबंदीसंबंधी तक्रार करू शकता.
✅ अपडेट्स मिळवा SMS द्वारे
वीजपुरवठा व बिलासंदर्भातील अपडेट्स मिळवण्यासाठी MREG<स्पेस><12 अंकी ग्राहक क्रमांक> असा संदेश 9930399303 वर पाठवा.
👉 कृपया हे टाळा:
👉 वीज पुरवठा बंद झाल्यानंतर गोंधळून न जाता थोडा वेळ वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट बघा. तात्काळ वीज केंद्र किंवा वीज कर्मचाऱ्यांशी संपर्क न साधता संयम राखा.
👉 वीज कर्मचारी, अभियंते यावेळी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. संगणकीकृत ग्राहक सेवा केंद्र ग्राहकांच्या तक्रारी कालबद्ध प्रमाणात विविध स्तरांवर पाठपुरावा करून आपली तक्रार निर्गमीत करण्याचा उत्तम पर्याय आहे.