नाशिक: महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 126 तुकडीचा दीक्षांत समारंभ

नाशिक। दि. २२ डिसेंबर २०२५: महाराष्ट्र पोलीस अकादमीत वर्षभर खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 126 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ बुधवार, 24 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथील मुख्य कवायत मैदान येथे होणार आहे, असे प्रबोधीनीचे उपसंचालक (प्रशासन) संजय बारकुंड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 126 चे प्रशिक्षण 23 डिसेंबर 2024 पासुन सुरू झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवड झालेले 322 पुरूष व 67 महिला असे एकूण 389 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. या प्रशिक्षणार्थींपैकी 82 टक्के प्रशिक्षणार्थी हे पदवीधर, 18 टक्के पदव्युतर आहेत. वर्षभराच्या कालावधीत या प्रशिक्षणार्थींना आंतरवर्गात भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि स्थानिक व विशेष कायदे, फॉरेन्सिक सायन्स, सायबर क्राईम, गुन्हेगारी शास्त्र तसे बाह्यवर्गात पद कवायत, शस्त्र कवायत, शारिरीक प्रशिक्षण, गोळीबार सराव, योग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

या दीक्षांत समारंभ कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलाणी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून ते प्रशिक्षणार्थींकडून मानवंदना स्वीकारतील. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक नवल बजाज हे सर्व प्रशिक्षणार्थींना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. हा कार्यक्रम यु ट्यूब लाईव्ह वर देखील प्रसारीत केला जाणार असल्याचे उपसंचालक श्री. बारकुंड यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790