नाशिक: आयपीएल सामन्यावर सट्टा लावणारी टोळी जेरबंद!

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आयपीएल स्पर्धेत गेल्या शुक्रवारी (ता. २४) झालेल्या सामन्यावर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्या दोघांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. तपासातून आणखी पाच संशयितांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल येथील हॉटेल फुडहब याठिकाणी सदरची कारवाई करण्यात आली आहे.

संशयित भव्य चैतन्य दवे (२५, रा. दहिसर मुंबई), जतिन नवीन साहा (४१, रा. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आयपीएल सट्टेबाजांची नावे आहेत. गेल्या शुक्रवारी (ता. २४) आयपीएल सामन्यातील सनराईज हैदराबाद आणि राजस्थान रॉयल या दोन संघा सामना सुरू असताना, त्यावर संशयितांकडून सट्टा लावला जात होता.

याची खबर स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली असता, पथकाने हॉटेल फुडहब याठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. संशयित हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे पैसे लावून बेकायदेशीररित्या सट्टा लावून जुगार खेळत होते. दोघांनी हॉटेलमध्ये रुम बुक करीत असताना बनावट आधारकार्ड व नाव वापरले.

तसेच, मोबाईलवरून बनावट सीमकार्ड वापरून वेगवेगळ्या आयडीवरून बुकींसोबत बेकायदेशीररित्या सट्टा लावून खेळत होते. संशयितांकडून विविध कंपन्यांचे चार मोबाईल, साहित्य असा २२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ओझर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

यांना केली मुंबईतून अटक:
याप्रकरणी अटकेतील दोघांच्या चौकशीतून आणखी पाच संशयितांची नावे उघड झाल्यानंतर ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने संशयित प्रथम राजेश सूचक (२३, रा. मुलूंड पश्चिम, मुंबई), विनोद सुभाषचंद्र गुप्ता (५०, रा. विक्रोळी पूर्व, मुंबई), रमेश श्रीगोपाळ जयस्वाल (५४, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई), विशाल किर्तीकुमार मडियॉ (४९,रा. मुलूंड पश्चिम, मुंबई), निखील विरचंद विसरिया (४६, रा. मुलूंड पश्चीम, मुंबई) यांना अटक करण्यात आलेली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोली निरीक्षक राजू सुर्वे हे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790