नाशिक: कुंभमेळ्यासाठी विविध विकास कामे करणाऱ्या यंत्रणांसाठी आता वित्तीय कार्यप्रणाली- डॉ. प्रवीण गेडाम

कामाची सद्यस्थिती आणि कुंभमेळ्यासाठी त्याचे महत्व तसेच जनहित लक्षात घेऊनच निधीचे वितरण होणार

नाशिक। दि. ०६ ऑक्टोबर २०२५: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध कार्यान्वयीन यंत्रणांकडून होणाऱ्या विकास कामांच्या निधी वितरणासाठी आता नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने वित्तीय कार्यप्रणाली निश्चित केली आहे. विकासकामांच्या प्रत्येक टप्प्यांवर आता निधी वितरणाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून कामाची सद्य:स्थिती आणि कुंभमेळ्यासाठीचे त्याचे महत्व लक्षात घेऊनच या निधीचे वितरण केले जाणार असल्याची माहिती या प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

प्राधिकरणाकडे निधी उपलब्ध असतांना तो काही प्रमाणात कामाच्या खर्चापेक्षा अधिक संबंधित यंत्रणेकडे राहील अशी व्यवस्था या कार्यप्रणालीमुळे शक्य होणार आहे. यामुळे कंत्राटदारांची देयकेही वेळेवर निर्गमित करण्यास मदत होईल. मात्र गुणवत्ता आणि इतर बाबी मध्ये कमतरता आढळल्यास, त्याची पूर्तता झाल्यावरच निधी वितरित करण्यात येईल. यामुळे वेळ आणि गुणवत्ता या दोन्ही कायम ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच, या संपूर्ण कामांमध्ये पारदर्शकता येण्यास निश्चित मदत होणार आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम 2025 चे कलम 15 नुसार शासनाचे विविध प्रशासकीय विभाग, शासकीय कंपन्या किंवा संविधिक मंडळे किंवा महामंडळे यांच्या कडून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडे प्राप्त झालेला निधी त्वरित संबंधित अंमलबजावणी अभिकरण / कार्यालयीन यंत्रणेला वितरीत करण्यासाठी ही कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. यामुळे, प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांच्या बाबतीत संबंधित लेखाशिर्षात प्राधिकरणाकडे उपलब्ध निधीच्या प्रमाणात संबंधित कामांना कार्यारंभ आदेशानंतर त्या त्या प्रमाणात, मात्र एका टप्प्यात कामाच्या एकूण रकमेच्या अधिकतम 20 टक्के इतका निधी वितरीत करण्यात येईल.

⚡ हे ही वाचा:  त्र्यंबकेश्वरला प्रवेश खुला; प्रवेश शुल्क रद्द करण्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय !

त्यासाठी या यंत्रणांनी त्यांच्या कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याबरोबर निधीची मागणी करणे आवश्यक आहे. कामाच्या कार्यारंभ आदेशाच्या रक्कमेच्या 20 टक्के रकमेपैकी तीन-चतुर्थांश रक्कम (म्हणजेच एकंदरीत रक्कमेच्या 15 टक्के रक्कम) सबंधित कंत्राटदार/ पुरवठादार / सेवा पुरवठादार यांना कामाच्या भौतिक प्रगतीनुसार अदायगी झाल्यानंतर पुढील 20 टक्के रक्कमेची मागणी प्राधिकरणाकडे करावी लागेल. हीच पद्धत पुढील 20 टक्के निधी मागणीसाठी अवलंबावी लागणार आहे. अशाप्रकारे प्राप्त झालेल्या एकूण 40 टक्के रक्कमेपैकी 35 टक्के रक्कम सबंधित कंत्राटदार/पुरवठादार / सेवा पुरवठादार इत्यादींना अदायगी झाल्यानंतर त्यापुढील 20 टक्के रकमेची मागणी करता येणार आहे.

पहिल्या टप्प्या नंतरच्या रक्कमा वितरीत होण्यापूर्वी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम 2025 मधील विविध तरतुदीनुसार पारित केलेल्या आदेशाची, निर्देशाची आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे किंवा कसे याची पडताळणी प्राधिकरण करेल. तसेच वेग आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत दिलेल्या निर्देशाचे पालन झाले आहे किंवा कसे याची विशेषतः तपासणी करण्यात येईल.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यावर अडवत जबरी लूट करणाऱ्या दोघा सराईतांना अटक !

त्यामुळे कामाचा दुसरा हप्त्यापासून पुढील निधीची मागणी करतांना याबाबतचे सर्व खुलासे संबंधित अंमलबजावणी अभिकरण / कार्यालयीन यंत्रणांनी समाधानकारकरित्या दिले आहेत याची खात्री प्राधिकरणाच्या कार्यालयामार्फत करण्यात येईल. समाधानकारक खुलासे /स्पष्टीकरण नसल्यास उचित पूर्तता झाल्याशिवाय पुढील निधी वितरित करण्यात येणार नाही, असे ही वित्तीय कार्यप्रणाली निश्चित करताना स्पष्ट करण्यात आले आहे.

विनाकारण कामे रखडणार नाही, याची काळजी संबंधित यंत्रणांना घ्यावी लागणार आहे. कामाचा दर्जा/ गुणवत्ता आणि वेग तपासण्यासाठी, त्याचप्रमाणे अंमलबजावणी अभिकरण/ कार्यालयीन यंत्रणेच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेमार्फत वेळोवेळी तपासणी व मुल्यांकन करण्यात येईल आणि यासाठीचा येणारा खर्च हा कामाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेतून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत थेट संबंधित यंत्रणांना अदा केली जाईल असे यापूर्वीच आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व अंमलबजावणी अभिकरण / कार्यालयीन यंत्रणांनी निधीची मागणी करतांना प्राधिकरणामार्फत त्रयस्थ यंत्रणा तपासणी शुल्क वगळून फक्त कामाच्या कार्यारंभ आदेशाच्या रक्कमेची मागणी प्राधिकरणाकडे करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विशिष्ट प्रकल्प, लहान कामे, वस्तू पुरवठा, सेवा पुरवठा अशा प्रकारच्या कामामध्ये 20 टक्क्यांच्या प्रमाणे देयके पारित करण्यासाठी अनावश्यक कालापव्यय करणारे ठरू शकते. अशा प्रकरणी कमी टप्प्यात निधी वितरणासाठी मागणी प्राधिकरणाकडे नोंदविता येईल आणि अशा मागणीबाबत प्राधिकरणामार्फत प्रकरणपरत्वे विचार करण्यात येईल. निधीची मागणी करताना ती कामनिहाय करावी, कामाच्या गटनिहाय करू नये.

⚡ हे ही वाचा:  राज्यात आज-उद्या तुरळक पावसाची शक्यता !

प्राप्त झालेल्या निधीचा हिशोब कामनिहाय ठेवावा. विशिष्ट कामासाठी दिलेला निधी अध्यक्ष, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांच्या पूर्वपरवानगी शिवाय इतरत्र वळवू नये. आवश्यकतेनुसार संबंधित अंमलबजावणी अभिकरण / कार्यालयीन यंत्रणांना वितरीत केलेल्या निधीला वळविण्याचे किंवा पुनर्विनियोजनाचे आदेश प्राधिकरणामार्फत देण्यात येतील. विशिष्ट परिस्थिती असल्यास परिस्थितीनुरूप निधी वितरण करण्यात येईल. उदा. मोबिलायझेशन अग्रीमची तरतुद असल्यास ती बाब विचारात घेऊन त्याप्रकारे निधी वितरीत करण्यात येईल. कामाची सद्यस्थिती आणि कुंभमेळ्यासाठी त्याचे महत्व याचा विचार करून त्याप्रमाणे निर्णय घेता येईल. अशाप्रकारे परिस्थितीनुरूप आणि प्रकरणपरत्वे तसे निधी वाटपाचे निर्णय घेण्यात येतील आणि अशावेळी वर नमुद केलेल्या प्रक्रियेपेक्षा वेगळी प्रक्रिया अवलंबिण्यात येईल, असे या वित्तीय कार्यप्रणालीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

सर्व अंमलबजावणी अभिकरण आणि कार्यालयीन यंत्रणांनी या वित्तीय कार्यप्रणालीमध्ये दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही याद्वारे देण्यात आले आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790