
नाशिक। दि. २४ जानेवारी २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांच्या वतीने सुरू करण्यात आलेली आणि नियोजित कामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तथा नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले. सर्व यंत्रणांनी एकत्रित आणि समन्वयाने कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे प्रधान सचिव श्री.डवले यांनी आज सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी प्रधान सचिव श्री. डवले यांनी विविध यंत्रणा निहाय कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. विशेषतः सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात तसेच त्र्यंबकेश्वर नगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्त्यांची कामे, घाट दुरुस्ती आणि सुशोभिकरण, पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धन, रामकाल पथ कामाची प्रगती, जलकुंभांची निर्मिती, साधुग्राम मधील प्रस्तावित कामे, मलनिस्सारण आणि जलशुद्धीकरण केंद्रांची सद्यस्थिती आणि पूर्णत्वासाठी यंत्रणेने केलेले प्रयत्न आदींची तपशीलवार माहिती श्री. डवले यांनी घेतली.
सध्या नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. रामकाल पथाचे कामही अधिक गतीने पूर्ण करावे. सध्या जी कामे विविध यंत्रणांनी सुरू केली आहेत, ती पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. जिथे काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तिथे विविध यंत्रणांनी समन्वयाने मार्ग काढावा. विशेषतः भूसंपादन प्रकरणी तातडीने कार्यवाही अपेक्षित असल्याचे सचिव श्री. डवले यांनी नमूद केले.
याबाबत संबंधित नागरिकांच्या शंकांचे निरसन करून मार्ग काढण्याच्या तसेच जिथे काहीच अडचण नाही ती कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यंत्रणांनी आता कामांची अपेक्षित गती घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मार्च २०२७ पूर्वी कुंभमेळा अनुषंगिक विकासकामे पूर्ण होतील, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तुम्ही करत असलेले काम हे चांगली संधी आहे. इथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा निर्मिती तुम्ही करत आहात. त्यामुळे कामे मार्गी लावण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या. यापुढे दरमहा कामांच्या गतीचा आढावा घेणार असल्याचे श्री. डवले यांनी सांगितले.
यावेळी, विभागीय आयुक्त डॉ. गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह यांनी कुंभमेळा कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली तर विविध यंत्रणांनी सध्या सुरू असलेल्या कामाच्या गतीविषयी माहिती दिली.
![]()


