
नाशिक। दि. ५ डिसेंबर २०२५: सिंहस्थ कुंभमेळा काळात संभाव्य आपत्कालिन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी मोठी असणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापन आवश्यक साहित्य मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव मंगळवारपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे तातडीने सादर करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने साहित्य मागणी संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते. यावेळी महानरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धन सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
साहित्य मागणीचे प्रस्ताव सादर करतांना आरोग्य यंत्रणांनी साहित्यांच्या दरात एकसूत्रता ठेवणे आवश्यक आहे. ग्रामण व शहरी भागातही साहित्य दरात तफावत नसावी. आरोग्य विषयक साहित्यांची मागणी करतांना त्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या व अनुषंगिक बाबींचे अभ्यासपूर्वक अवलोकन करून त्यांचा समावेश प्रस्तावात करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विभागांनी त्यासंदर्भातील शासन निर्णयांचेही अवलोकन करावे.
मागणी केलेल्या आपत्ती विषयक साहित्याच्या हातळणीबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी प्रशिक्षक एजन्सी नियुक्त करतांना प्रशिक्षणाची गुणवत्ता, प्रशिक्षण अभ्यासक्रमातील नमूद बाबी गांर्भीयपूर्वक तपासाव्यात. आवश्यक साहित्य खरेदीबाबत संबंधित विभागाची तांत्रिक मान्यता घेण्यात यावी. तांत्रिक मान्यता घेतांना सह साहित्याचे दरासह विवरण परिपूर्ण असावे. आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे प्रस्ताव सादर करतांना ते आवश्यक साहित्याचे अंदाजपत्रक, डिझाईनसह, दर यासह परिपूर्ण असावेत. वेळेत आलेल्या परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करून पहिल्या टप्प्यातील मंजुरी घेणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.
![]()
